सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पावसाचा फटका; रब्बीची पेरणी अवघी १४.७४ लाख हेक्टरवर, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर…
विशेष बातमी | मुंबई : राज्यात यंदा सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून, रब्बी हंगामातील पेरणीने आजवरचा नीचांक गाठला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ १४.७४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. १९७२-७३ च्या भीषण दुष्काळात ही पेरणी ४७.२९ लाख हेक्टर होती. त्यामुळे यंदाची परिस्थिती १९७२ पेक्षाही गंभीर असल्याचे चित्र आहे. राज्यातील सरासरी रब्बी पेरणी क्षेत्र ५५ ते ६० लाख हेक्टर असून, डिसेंबरअखेर केवळ २० ते २५ लाख हेक्टरपर्यंतच पेरणी होण्याची अपेक्षा आहे.
आतापर्यंत झालेल्या पेरणीपैकी अन्नधान्य पिकांखाली ७.७९ लाख हेक्टर, कडधान्य पिकांखाली ६.७८ लाख हेक्टर, तर तेलबियांखाली अवघे १६ हजार १०६ हेक्टर क्षेत्र आहे. तेलबिया पिकांची पेरणी अत्यल्प असल्याचे यावरून स्पष्ट होते.
एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिली. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल ५९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला. जुलै महिन्यातील पंधरा दिवसांतच बहुतांश पाऊस पडला आणि त्यानंतर पावसाने मोठा खंड दिला. परिणामी जमिनीतील ओलावा घटला आणि रब्बी पेरण्यांना अडथळा निर्माण झाला. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची शाश्वती नसल्याने शेतकरी पेरणी करण्यास धजावत नाहीत. खरीप हंगामाला फटका बसल्यानंतर आता रब्बीही संकटात सापडल्याने शेतकरी दुहेरी संकटात आहे.
उपलब्ध सिंचनाच्या पाण्यावर चारा पिकांची लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दुष्काळात माणसांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करण्यापेक्षा जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान ठरणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
दुष्काळाचा फटका पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेलाही बसला आहे. प्रशासनाने यंदा १२ ते १५ लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र शुक्रवारी पंढरपुरात केवळ ३ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले. ग्रामीण भागातील विस्कळीत जनजीवनाचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. पाणी, चारा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सरकार कोणत्या उपाययोजना करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
![]()

