जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पुण्यातील राज्यस्तरीय बाल संसदेत निवड…
प्रतिनिधी | अमळनेर :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील उदयनगर येथील तनिष्का प्रकाश वाघ हिची महाराष्ट्राच्या ‘बाल आरोग्यमंत्री’पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालदिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय बाल संसदेत तिची ही निवड करण्यात आली. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तनिष्का ही उदयनगर तथा डांगर बु. येथील लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांची कन्या आहे. तिची ही निवड तिच्या नेतृत्वक्षमतेची आणि गुणवत्तेची पावती मानली जात असून, तिच्या यशाबद्दल जळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उपक्रमात महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील १०२ गावांतील बालकांनी सहभाग घेतला. राज्यातील सहा विभागांतून २२ बालप्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यातून बाल मुख्यमंत्री, बाल विधानसभा अध्यक्ष, बाल विरोधी पक्षनेता आणि विविध खात्यांच्या बालमंत्र्यांची निवड करून प्रत्यक्ष संसदीय कामकाजाच्या धर्तीवर बाल संसद पार पडली. बालकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढविणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांच्या समस्या व हक्क मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या बाल संसदेचा मुख्य उद्देश होता.
या संसदेत बालप्रतिनिधींनी शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, पोषण आणि बालसुरक्षा यांसारखे प्रश्न मांडले. बालमंत्र्यांनी या प्रश्नांना उत्तरे देत बालकांच्या अडचणी समजून घेतल्या.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित राहून बालप्रतिनिधींचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, त्यांच्यासह विविध जिल्ह्यांतील सदस्य, यशदा आणि युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते.
![]()

