गोवंश कत्तलीच्या तक्रारींनंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी निर्णय; पोलीस व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाची उपस्थिती…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील कत्तलखान्यात गोवंश कत्तलीच्या तक्रारींनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ५७० किलो मांस आढळल्याने नगरपालिकेने अखेर हा कत्तलखाना सील केला आहे. आदेशांचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करत आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.
कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सलग दोन दिवस तपासणी केली असता कत्तल केलेले मांस, कातडी आणि शिंगे आढळून आली. या कारवाईत सुमारे ५७० किलो मांस जप्त करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेनंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली. शिष्टमंडळाच्या माध्यमातून नगरपालिकेला निवेदन देत कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो उद्ध्वस्त करण्याची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आमदार शिरीष चौधरी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी नगरसेवक व अधिकारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर कत्तलखाना सील करण्याचे आदेश देण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी आरोग्य विभागाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, संतोष जाधव, किरण कंडारे तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कत्तलखाना सील करण्यात आला.
दरम्यान, कत्तलखान्यातील ओटेधारकांना अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी नोटिसा बजावण्यात येणार असून, दंडात्मक कारवाईदेखील प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. कत्तलखाना सील झाल्याने सध्याच्या वादावर तात्पुरता पडदा पडला असला, तरी तो कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करणाऱ्या संघटनांची पुढील भूमिका आणि पालिका प्रशासनाची पुढील कारवाई, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
![]()

