वनविभागाची पाहणी; शेतकरी, पशुपालकांना रात्री सतर्क राहण्याची सूचना…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील निम शिवारात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या वासराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमळनेर येथील डॉ. संदीप जोशी यांच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या आवारात ही घटना घडली. वनपाल गुलाब पिंजारी यांनी घटनास्थळी पाहणी करून प्राण्याच्या ठशांच्या आधारे हा हल्ला बिबट्याचा नसून तडसाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
डॉ. जोशी यांच्या मालकीच्या निम शिवारातील शेतात निम येथील शेतकरी सुदाम पाटील कामकाज पाहतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. वासरावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अमळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच वनपाल गुलाब पिंजारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राण्याच्या ठशांच्या आधारे वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून तडस (हिंस्त्र प्राणी) असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात बिबट्या असल्याच्या अफवा पसरत असल्याने त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
रात्री शेतात जाताना एकट्याने जाणे टाळा
शिवारात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने शेतकरी व पशुपालकांनी रात्रीच्या वेळी शेतात ये-जा करताना सतर्कता बाळगावी, एकट्याने जाणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे वनविभागाकडून सूचित करण्यात आले आहे.
![]()

