जळोद डोहातील साठा ५ ते १० डिसेंबरपर्यंतच पुरण्याचा अंदाज…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील पाणीटंचाई आता गंभीर रूप धारण करू लागली असून, एकेकाळी तीन दिवसाआड होणारा नळाचा पाणीपुरवठा आता सहा ते सात दिवसांवर पोहोचला आहे. जळोद डोहातील साठा केवळ ५ ते १० डिसेंबरपर्यंत पुरेल इतकाच शिल्लक असल्याने डिसेंबर महिन्यातच गिरणा नदीचे पहिले आवर्तन घ्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरणेचे पाणी वेळेत तापीत आल्यास तूर्तास दिलासा मिळू शकतो, अन्यथा शहराला पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत गिरणा नदीचे पाणी तापी नदीत आल्यास काही दिवसांसाठी टंचाईची तीव्रता कमी होऊ शकते. मात्र हे पाणी वेळेत न आल्यास १५ डिसेंबरपर्यंत पहिले आवर्तन घ्यावे लागू शकते. आवर्तन मिळाले नाही, तर कलाली डोहातील ६५ अश्वशक्तीच्या तीन पंपांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांनीही हीच माहिती देत, गिरणेचे पाणी तापीत आल्यास संकट काही प्रमाणात दूर होईल, अन्यथा पहिले आवर्तन घ्यावे लागेल, असे स्पष्ट केले.
अमळनेर शहराला जळोद येथून तापी नदीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी ३४० अश्वशक्तीचे दोन आणि २७५ अश्वशक्तीचे दोन पंप कार्यरत आहेत. शहरात सुमारे २५ हजार मालमत्ता आणि १८ हजार नळजोडण्या आहेत. यापूर्वी जुन्या गावात चार दिवसाआड, तर कॉलनी परिसरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता; आता तो सहा ते सात दिवसांवर गेल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नगरपरिषदेने हतनूर धरणातून तीन आवर्तने राखीव ठेवली आहेत. याशिवाय शहरातील १९ विहिरी आणि २४ सार्वजनिक बोअरवेल यांचा पर्यायी पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी विहिरींचा गाळ काढणे, बोअरवेल पुनर्जीवित करणे आणि पंप मोटारी बसवणे यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही नियोजन असल्याचे सांगण्यात आले. उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरावे, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नगराध्यक्षांचे आवाहन : एकही थेंब वाया घालवू नका
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आणि पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. “नैसर्गिक पाणीटंचाईच्या संकटाला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याची गरज आहे,” असे सांगत त्यांनी ऑगस्ट २०२७ पर्यंत तिन्ही आवर्तने पुरतील, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
![]()

