वसुलीसाठी तगादा न लावण्याची बीडीओंकडे विनंती…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, तसेच ग्रामपंचायतींनी वसुलीसाठी तगादा लावू नये, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने तसेच रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, शेतमजुरांना रोजगार मिळत नाही आणि सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
अशा संकटाच्या काळात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांना नोटिसा देणे, सक्ती करणे अथवा मानसिक त्रास देणे थांबवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना योग्य ते आदेश द्यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील, ईश्वर उखा पाटील, संदीप सैंदाने, हुमेश पाटील, अॅड. युवराज कोळी, जितेंद्र प्रभाकर काटे, भूषण कोळी, दिलीप पाटील, रविंद्र पाटील आणि राजिक मुजावर उपस्थित होते.
![]()

