बांधकाम परवानगी खरी की खोटी? मोबाईलवर QR Code स्कॅन करून परवानगीची खात्री करा; BPMS प्रणालीवरील नोंद पाहूनच बांधकाम सुरू करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे जाहीर आवाहन…
प्रतिनिधी | अमळनेर : काही अनधिकृत व अप्रवृत्तीचे इंजिनिअर (अभियंते) आणि आर्किटेक्ट (वास्तुविशारद) नगरपरिषद कार्यालयात कोणतीही कागदपत्रे सादर न करता, तसेच शासकीय शुल्क न भरता नागरिकांना बनावट बांधकाम परवानगी पत्रे व बनावट पैसे भरल्याच्या पावत्या (चलन) देत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी जाहीर सूचना काढून नागरिकांना सावध केले आहे.
अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेले बांधकाम पूर्णतः अनधिकृत ठरवले जाईल. त्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे?
फसवणूक टाळण्यासाठी नगरपरिषदेने तीन मुद्द्यांवर दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
- १. QR Code द्वारे तपासणी : नागरिकांनी नेमलेल्या इंजिनिअर किंवा आर्किटेक्टने दिलेल्या बांधकाम परवानगी पत्रावर (Sanction of Building Permission and Commencement Certificate) QR Code असतो. हा QR Code मोबाईलद्वारे स्कॅन करून संबंधित परवानगी नगरपरिषदेच्या अधिकृत प्रणालीवर (BPMS) नोंदणीकृत असल्याची खात्री करावी.
- २. परवानगीची पडताळणी : तपासणीत परवानगी असत्य आढळल्यास नगरपरिषदेच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावे. सध्या नगरपरिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास परवानग्या पूर्णपणे BPMS या शासनाच्या प्रणालीद्वारे ऑनलाइन दिल्या जात असून सर्व प्रकारचे शुल्क ऑनलाइनच भरले जाते.
- ३. कार्यालयीन खातरजमा : QR Code स्कॅन करताना तांत्रिक अडचण आल्यास किंवा परवानगीच्या सत्यतेबाबत किंचितही शंका असल्यास, बांधकाम सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी स्वतः अमळनेर नगरपरिषद कार्यालयातील नगररचना (Town Planning) विभागाशी संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.
सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे आणि कोणत्याही आमिषाला किंवा बनावट कागदपत्रांना बळी पडू नये, अशी जाहीर आवाहन मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांनी केली आहे.
![]()

