६०-७० प्रकरणे उघड; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणार, लोकनियुक्त नगराध्यक्षांची माहिती…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील काही खासगी अभियंत्यांनी फोटोशॉपमध्ये एडिट करून नगरपरिषदेच्या बनावट बांधकाम परवानग्या आणि बनावट चलन पावत्या तयार करून नगरपरिषद व नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत ६० ते ७० प्रकरणे समोर आली असून प्रत्यक्षातील संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे. या सर्व दोषींवर रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
नव्याने अभियंता म्हणून व्यवसायात उतरलेल्या काही तरुणांनी नागरिकांकडून बांधकाम परवानगीचे कंत्राट घेतले. नागरिकांना पालिकेत न येऊ देता, त्यांचा अर्जही पालिकेत सादर न करता, परस्पर स्कॅन केलेल्या बांधकाम परवानग्या आणि बनावट पावत्या त्यांना देण्यात आल्या. काही नागरिक बांधकाम परवानगीसंदर्भात पालिकेत आले असता, त्यांच्या परवानग्या ऑनलाइन पोर्टलवर दिसत नसल्याचे निदर्शनास आले. त्यातून एका खासगी अभियंत्याचे नाव समोर आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, संबंधिताने एका परवानगीत आणि पावतीत फोटोशॉपमध्ये बदल करून कागदपत्रे दिल्याचे आढळले.
या बनावट पावत्या आणि बांधकाम परवानग्यांच्या आधारे काही नागरिकांना बँकांकडून कर्ज मंजूर झाल्याचेही समोर आले आहे. नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झालेच, शिवाय नागरिकांना फसवून त्यांच्याकडून घेतलेले पैसे कथित अभियंत्यांनी स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोप आहे.
या प्रकारानंतर पालिकेने नोटीस जाहीर केली असून यापुढे क्यूआर कोडद्वारे परवानग्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच बँकांनाही यासंदर्भात पत्र पाठवले जाणार आहे. नागरिकांनी आपली परवानगी अधिकृत बीपीएमएस प्रणालीवर नोंदवलेली आहे की नाही, याची खात्री करावी. अनधिकृत परवानगी ग्राह्य धरली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी आपल्या परवानग्या अधिकृत करून घ्याव्यात, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येणार आहे.
दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून बनावट परवानग्या घेतलेल्या नागरिकांकडून संबंधित अभियंत्यांची नावे उघड करून घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पालिकेला पैसे न भरता परस्पर बनावट परवानग्या घेणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
“नगरपरिषद आणि नागरिकांना लुटणाऱ्या सर्व अभियंते व दलालांचा शोध घेऊन त्यांच्यावर रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंदर्भात मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांना आदेश देऊन योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे डॉ. परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद यांनी सांगितले.
![]()

