मराठा मंगल कार्यालयाजवळील घटना; पोलिसांनी तातडीने तपास करून गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : शहराच्या मध्यवर्ती आणि भरवस्तीच्या भागातून चोरट्यांनी चारचाकी वाहनातून दोन गायी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मराठा मंगल कार्यालयाजवळून १८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २.३० ते २.४० वाजेच्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून यश वर्मा यांच्या मालकीच्या दोन गायी पळविण्यात आल्या. चोरीचा हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहराच्या गजबजलेल्या भागातही जनावरांची चोरी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण आहे.
चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झाला आहे. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आणि चोरीची वेळ निश्चित असल्याने या चित्रणाच्या आधारे तपासाला दिशा मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. मध्यवर्ती वस्तीत पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून जनावरे चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी दाखविल्याने त्यांच्यात कायद्याचा कोणताही धाक उरला नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास करून संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. भरवस्तीतून जनावरे चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![]()

