अपर जिल्हाधिकाऱ्यांचे एकाच दिवशी तीन स्वतंत्र आदेश; दोन सदस्य अतिक्रमणामुळे, एक सदस्या कर न भरल्याने अपात्र…
प्रतिनिधी | मठगव्हाण ता. अमळनेर : मठगव्हाण ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी तीन स्वतंत्र आदेशांद्वारे अपात्र घोषित केले. शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी दिपक सुभाष पाटील व रविंद्र गोरख पाटील, तर ग्रामपंचायत कर विहित मुदतीत न भरल्याप्रकरणी अल्काबाई दगाजी पाटील यांना अपात्र ठरविण्यात आले. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत सदस्या रेखाबाई शिवाजी भिल यांनी दाखल केलेल्या तीन विवाद अर्जांवर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदारांतर्फे अॅड. वसंत एस. भोलाणकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
दिपक सुभाष पाटील यांच्या प्रकरणात मालमत्ता क्र. ९२/१ च्या मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम करून शासकीय रस्ता व सार्वजनिक जागेवर २४४.८० चौ. फूट अतिक्रमण केल्याचे मोजणी अहवालातून निष्पन्न झाले. भूमी अभिलेख विभागाची मोजणी व संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालांच्या आधारे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाचा निष्कर्ष नोंदविला.
दुसऱ्या प्रकरणात रविंद्र गोरख पाटील यांच्या मालमत्ता क्र. २४ बाबतही मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम आढळले. प्रत्यक्ष मोजणीनुसार सुमारे ४३८ चौ. फूट सार्वजनिक व शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्याचे अहवालात नमूद आहे. दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १४(१)(ज-३) अंतर्गत अपात्रतेची कारवाई करण्यात आली. आदेशानुसार, अतिक्रमण अस्तित्वात असेपर्यंत दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
अल्काबाई दगाजी पाटील यांनी सन २०२५-२६ मधील ग्रामपंचायत कर विहित मुदतीत भरला नसल्याचा विवाद अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने २३ सप्टेंबर २०२५ रोजी कराची मागणी केली असताना, कराचा भरणा २२ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आला. त्यामुळे निर्धारित तीन महिन्यांच्या मुदतीनंतर कर भरल्याचे नोंदविण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४(ह) नुसार, कराची मागणी झाल्यानंतर तीन महिन्यांत कर न भरल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो. या तरतुदीनुसार अल्काबाई पाटील यांना विद्यमान ग्रामपंचायत कालावधीपुरते अपात्र घोषित करण्यात आले.
दोन्ही अतिक्रमण प्रकरणांत जनाबाई गायकवाड विरुद्ध अॅडिशनल कमिशनर, महाराष्ट्र शासन (सिव्हिल अपील क्रमांक ६८३२/२०१८) या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेण्यात आला. शासकीय किंवा सार्वजनिक मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेबाबत या निकालाचा विचार करण्यात आला.
अतिक्रमण आणि कर थकबाकी या दोन वेगवेगळ्या कारणांवर एकाच दिवशी तीन आदेश आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईमुळे शासकीय नियम, सार्वजनिक मालमत्ता आणि कर भरण्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करणे सदस्यांसाठी किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
![]()

