कनिष्ठ सहाय्यकापासून संचालकांपर्यंत संपूर्ण लेखा परिवार एकाच व्यासपीठावर; १० नोव्हेंबर २०२६ ते २०२७ हे वर्ष ‘आत्मविश्वासाचे वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा FAEU चा संकल्प…
प्रतिनिधी | जळगाव : महावितरणच्या इतिहासात प्रथमच १० नोव्हेंबर हा जागतिक लेखा दिन विशेष उत्साहात आणि व्यापक स्वरूपात साजरा करण्यात आला. फायनान्स अँड अकाऊंट एम्प्लॉईज युनियन (FAEU) यांच्या पुढाकाराने आयोजित या विशेष राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील लेखा संवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Google Meet द्वारे ९३८ सदस्य, तर Live Streaming द्वारे ५५८ सदस्य अशा एकूण १,४९६ म्हणजेच जवळपास १,५०० लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग नोंदविला. कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदापासून ते संचालक (वित्त) पदापर्यंतचा संपूर्ण लेखा परिवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणे हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
या कार्यक्रमाला महावितरणचे संचालक (वित्त) मा. श्री. अनुदीपजी दिघे साहेब, कार्यकारी संचालक (वित्त व लेखा) मा. श्रीमती स्वाती व्यवहारे मॅडम आणि मुख्य महाव्यवस्थापक (सा.लेखा) मा. श्री. अनिल कालेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात FAEU चे केंद्रीय महासचिव श्री. विजय जाधव यांनी महावितरणच्या आर्थिक व्यवस्थापनामध्ये लेखा संवर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा योग्य सन्मान, त्यांच्या प्रश्नांची प्रशासनाकडून सकारात्मक दखल आणि संवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्य महाव्यवस्थापक (सा.लेखा) मा. श्री. अनिल कालेकर साहेब यांनी ‘Financial Discipline and Behavioural Changes’ या विषयावर मार्गदर्शन करताना आर्थिक शिस्त, पारदर्शकता, अचूक लेखांकन, संवाद कौशल्य, कामातील सातत्य आणि वेळेचे नियोजन या बाबी संस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कार्यकारी संचालक (वित्त व लेखा) मा. श्रीमती स्वाती व्यवहारे मॅडम यांनी FAEU च्या माध्यमातून कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल संघटनेचे विशेष कौतुक केले. महावितरणमधील भांडवलीकरण (Capitalisation), महसुली नुकसान (Revenue Loss) आणि वितरण हानी (Distribution Loss) कमी करण्यासाठी लेखा संवर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीचा वार्षिक आर्थिक अहवाल समजून घेऊन तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. आगामी IPO च्या पार्श्वभूमीवर कंपनीची आर्थिक स्थिती प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे नेण्यात लेखा संवर्गाने दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच Capital Market, IPO आणि Financial Literacy या विषयांवरील प्रशिक्षणासाठी FAEU कडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे मागविण्याची तयारी दर्शविली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महावितरणचे संचालक (वित्त) मा. श्री. अनुदीपजी दिघे साहेब यांनी दीपावली पाडवा आणि लेखा दिवस हा विलक्षण योगायोग असून ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून लेखा संवर्गाच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान व गुणगौरव करण्याचे नियोजन केले याबाबत साहेबांनी संघटनेचे विशेष कौतुक केले. तसेच लेखा व वित्त विभागाची तुलना मानवी शरीरातील हृदयाशी करत संस्थेच्या आर्थिक आरोग्यामध्ये या विभागाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. आर्थिक शिस्त, लेखा तत्त्वांचे काटेकोर पालन आणि योग्य प्रशासकीय निर्णयप्रक्रिया या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि AI च्या युगातही लेखा व वित्त विभागाला पर्याय नसल्याचे सांगत, बदलत्या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचे ज्ञान, भांडवली बाजारातील घडामोडी आणि आर्थिक साक्षरता आत्मसात करण्याचे आवाहन केले. महावितरणची आर्थिक स्थिती अनुकूल करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे देखील कौतुक केले.
FAEU चे केंद्रीय अध्यक्ष श्री. विशाल लोहार यांनी महावितरणच्या स्थापनेपासून आजपर्यंत लेखा संवर्गाने अत्यल्प मनुष्यबळात बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दिलेले योगदान अधोरेखित केले. प्रशिक्षणाच्या मर्यादा आणि बदलत्या कार्यपद्धती असूनही लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम केवळ एका संघटनेपुरता मर्यादित नसून संपूर्ण लेखा संवर्गाच्या सन्मानाचा आणि एकतेचा सोहळा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी FAEU चे केंद्रीय महासचिव श्री. विजय जाधव यांनी लेखा संवर्ग सन्मान उंचावून उत्कर्ष गाठण्यासाठी FAEU संघटनेचे भविष्यकालीन नियोजन पुढील प्रमाणे जाहीर केले.
- १० नोव्हेंबर २०२६ ते १० नोव्हेंबर २०२७ हे वर्ष ‘आत्मविश्वासाचे वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा संकल्प जाहीर केला. याअंतर्गत दरमहा चर्चासत्रे व कार्यशाळांचे आयोजन. प्रत्येक कार्यालयीन संवाद आपल्या वरिष्ठांचा आदर राखत अगदी निर्भयपणे आपली रास्त बाजू मांडली जाणे अपेक्षित असल्याचे त्यांनी वर्तविले.
- ‘पॉवरलाईन मॅगझीन’चे इंग्रजीतून मराठी भाषांतर उपलब्ध करून देणे तसेच
- अमेरिकास्थित Association of Certified Fraud Examiners (ACFE) संस्थेच्या माध्यमातून लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक गैरव्यवहारांची तपासणी करण्याचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
- सोबतच लेखा कर्मचारी यांना एकत्र येऊन एक निर्णय,एक भूमिका, एक संघ ताकद उभारण्याचे आवाहन केले.
मा. श्री राजेंद्रजी पवार साहेब, संचालक (मासं), महावितरण यांनी लेखा दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात वित्त व लेखा विभागाच्या योगदानाचा गौरव करत, महावितरणची आर्थिक शिस्त, पारदर्शकता, आर्थिक पत, Cash Flow Management आणि वित्तीय स्थैर्य टिकवून ठेवण्यात लेखा विभागाची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे अधोरेखित केले. वीज खरेदीपासून ग्राहकांकडील महसूल वसुलीपर्यंतच्या आर्थिक प्रक्रियेत वित्त व लेखा विभाग हा महावितरणच्या आर्थिक व्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला दिन व अभियंता दिनाप्रमाणे वित्त व लेखा विभागाच्या योगदानाला अधिकृत ओळख व सन्मान मिळावा, या उद्देशाने १० नोव्हेंबर हा लेखा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी राज्यातील सर्व लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन FAEU चे पुणे प्रदेश सहसचिव श्री. लक्ष्मीकांत पवार यांनी केले, तर आभारप्रदर्शन पुणे परिमंडळाचे अध्यक्ष श्री. मंगेश बेडगे यांनी केले. यावेळी महावितरणच्या विविध कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंडळ कार्यालयांमध्येही होणार लेखा कर्मचारी सन्मान सोहळे!
जागतिक लेखा दिनाच्या या राज्यस्तरीय सोहळ्यानंतर आता पुढील कार्यालयीन आठवड्यातील एका दिवशी, प्रशासनाच्या परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक मंडळ कार्यालयात स्थानिक पातळीवर लेखा कर्मचारी सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरील लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यांना सर्व लेखा बांधवांनी आवर्जून उपस्थित राहून लेखा कर्मचाऱ्यांचा सन्मान द्विगुणित करावा, असे आवाहन फायनान्स अँड अकाऊंट एम्प्लॉईज युनियन (FAEU) च्या वतीने करण्यात आले आहे.
लेखा क्षेत्रातील कार्याचा गौरव, लेखा संवर्गाच्या योगदानाचा सन्मान आणि संपूर्ण लेखा परिवारातील एकजूट व बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जवळपास १,५०० सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा लेखा संवर्गातील एकजुटीचा आणि FAEU च्या संघटनात्मक पुढाकाराला मिळालेल्या व्यापक प्रतिसादाचा प्रत्यय ठरला.
![]()

