कळमसरे रस्त्याजवळील खळ्यातून जनावरे गायब; शोध घेऊनही थांगपत्ता नाही…
प्रतिनिधी | मारवड, ता. अमळनेर, : वासरे (ता. अमळनेर) शिवारातील कडमसे रस्त्याजवळ असलेल्या गुरे-ढोरे बांधण्याच्या जागेतून दोन गायी व एक म्हैस बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वासरे येथील शेतकरी देविदास साहेबराव पाटील यांनी बुधवारी, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लेखी अर्ज देऊन जनावरांचा तपास करण्याची मागणी केली आहे.
अर्जात नमूद केल्यानुसार, देविदास पाटील हे वासरे गावात राहत असून शेती व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वासरे शिवारात कळमसरे रस्त्याजवळ त्यांचे गुरे-ढोरे बांधण्याचे ठिकाण (खळे) आहे. शेतीसाठी लागणारी बैलजोडी तसेच चारा ते तेथे ठेवतात. १८ नोव्हेंबर रोजी ते तेथे गेले असता त्यांना दोन गायी व एक म्हैस जागेवर आढळून आल्या नाहीत. त्यांनी स्वतः परिसरात शोध घेतला; मात्र जनावरांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.
जनावरे सापडत नसल्याने पाटील यांनी पोलीस ठाण्यात अर्ज देऊन या प्रकरणाची चौकशी करून तपास करावा, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यासाठी पशुधन हे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असल्याने जनावरांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे. दरम्यान, जनावरे चोरीस गेली की अन्य कारणाने बेपत्ता झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
![]()

