अपात्रांना लाभ दिल्याचा आरोप, प्रशासकीय कारवाईची मागणी; उपजिल्हाप्रमुख प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी आर. जे. शेख यांच्या कार्यपद्धतीची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, अमळनेर यांना निवेदन देऊन करण्यात आली. या प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. विशिष्ट धर्मातील अपात्र व्यक्तींना प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरणे, खोट्या तक्रारींवर कारवाई करण्याच्या धमक्या देणे, शासकीय कामकाजात अनावश्यक विलंब करणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, तसेच आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयातील कामकाज पारदर्शक आणि लोकाभिमुख असणे अपेक्षित असताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून आरोपांत तथ्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ कोणताही भेदभाव न करता पारदर्शक पद्धतीने मिळावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज संतोष शेटे, शहर संघटक पंकज अरुण चौधरी, अल्पसंख्याक शहरप्रमुख शेख अल्ताफ राजा फारुख, तसेच राहुल साहेबराव पाटील, जयेश रवींद्र चव्हाण, सनी पाटील, यश मोहन साळुंखे, गौरव रवींद्र पाटील, मनीष हरिश्चंद्र चौधरी, दिनेश पाटील, शेखर देशमुख, अविनाश पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेच्या हक्कांसाठी आणि शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी युवासेना कटिबद्ध असून, प्रशासनाने तक्रारींची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
![]()

