बोरनार येथील घटना; एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू, संशयितांचा शोध…
प्रतिनिधी | जळगांव : जळगांव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या प्रेमचे तेथे कोणाशीतरी जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून अज्ञात हल्लेखोराने प्रेमवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत प्रेमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला, याबाबत गावातील कोणीही माहिती देण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मृत प्रेम धनगर याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम हा अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. तो दोन दिवसांपूर्वीच आपल्या गावी आला होता. तरुणाच्या अशा अचानक आणि निर्घृण हत्येमुळे धनगर कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
![]()

