अमळनेर पालिकेला ‘आठ दिवसांची’ डेडलाइन, कत्तलखाना बंद न झाल्यास नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा; विहिंप-बजरंग दल आक्रमक…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून तो कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या अमळनेर प्रखंडाने केली आहे. यासाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत ठोस प्रक्रिया सुरू न झाल्यास नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कत्तलखान्याच्या कामकाजावर नगरपरिषद प्रशासनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप संघटनांनी निवेदनात केला आहे. गोवंश कत्तलीबाबत वारंवार तक्रारी येत असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची भूमिका त्यात मांडण्यात आली आहे.
या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी, तसेच कत्तलखान्यातील परवाने, पशुवैद्यकीय तपासणी, जनावरांची आवक-जावक आणि संबंधित नोंदवह्यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कत्तलखाना चालकांसह दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असेही निवेदनात नमूद आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा आणि संबंधित बांधकामाबाबतही नियमानुसार कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कत्तलखान्याच्या नियंत्रणाची जबाबदारी असलेले नगरपरिषद कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाचीही चौकशी करावी, अशी संघटनांची मागणी आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा किंवा संगनमत आढळल्यास संबंधितांवर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
प्रशासनाने आठ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा, अशी मागणी निवेदनात आहे. या मुदतीत कत्तलखाना बंद करण्याबाबत ठोस प्रक्रिया सुरू न झाल्यास नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड संयोजक सचिन माळी, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, बजरंग दलाचे प्रखंड गोरक्षक विश्वनाथ मिस्त्री, शहर गोरक्षक स्वप्निल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
आठ दिवसांच्या मुदतीनंतर नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, तक्रारींची निष्पक्ष चौकशी होते का आणि कत्तलखाना बंद करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू होते का, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.
![]()

