“आमचा नंबर लवकर लावा” वरून वाद; मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; शस्त्र कायद्याखालीही कारवाई…
प्रतिनिधी | अमळनेर : मका खरेदी करणाऱ्या दोंडाईचा येथील खरेदी अधिकाऱ्यावर दोघांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना १६ तारखेला रात्री सुमारे ८ वाजता मंगरूळ येथे घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला दोघा आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व शस्त्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फिर्यादी महेंद्र हिम्मतसिंग राजपूत (रा. महादेवपुरा, भगवा चौक, दोंडाईचा) हे तेथील एका कंपनीमध्ये मका खरेदी अधिकारी म्हणून काम करतात. मका खरेदीसाठी ते १६ तारखेला मंगरूळ येथील महादेव इंडस्ट्रीज येथे गेले होते. तेथे खरेदीची प्रक्रिया सुरू असताना एका ट्रकचालकाने आणि त्याच्यासोबत असलेल्या इसमाने “आमचा नंबर लवकर लावा” असे सांगितले. त्यावर महेंद्र यांनी, आधी शेतकऱ्यांचा क्रमांक आहे, त्यानंतर तुमचा क्रमांक येईल, असे सांगितले. हे उत्तर ऐकून दोघांना राग आला आणि त्यांनी महेंद्र यांना चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
उपस्थित लोकांनी दोघांना ते कुठले आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपली नावे हरपाल सुदामसिंग पवार व मयूर भटूसिंग जाधव (दोघे रा. पथारे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) अशी सांगितली. दरम्यान, भांडण वाढू लागताच हरपाल याने बाहेर जाऊन तलवार आणली आणि महेंद्र यांच्या पाठीवर मारले. वार चुकविण्यासाठी महेंद्र मागे वळल्याने त्यांच्या पाठीवर मुक्का मार लागला. त्यानंतरही दोघांनी शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या गोंधळात उपस्थितांपैकी एकाने हरपालच्या हातातून तलवार हिसकावून घेतली आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. महेंद्र राजपूत यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला दोघा आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच शस्त्र कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.
![]()

