डॉ. दीपक पाटील यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तातडीच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील पांझरा नदीवर असलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन दगडी बंधाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी व वाळूची गळती होत असल्याने मांडळसह वावडे व जवखेडा या तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे.
ब्रिटिश काळात बांधलेला हा दगडी बंधारा दोन शतकांपासून पांझरा नदीचे पाणी अडवून परिसरातील गावांना आधार देत आला आहे. मात्र काळाच्या ओघात त्याची झीज झाली असून, त्यातून होणारी गळती आता चिंतेचा विषय ठरत आहे. पाण्याबरोबर वाळूही वाहून जात असल्याने बंधाऱ्याच्या रचनेवरच परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. बंधाऱ्यात पाणी साठून राहिले नाही, तर या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून, बंधाऱ्याची दुरुस्ती तातडीने हाती घेण्याची गरज अधोरेखित केली आहे. दुरुस्ती वेळेत न झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे. आता जलसंपदा विभाग व मंत्र्यांकडून या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे तिन्ही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]()

