महायुतीतील जागावाटपानंतर घडामोड; सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांच्या नव्या पर्वाची सुरुवात…
प्रतिनिधी | अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीमुळे जिल्हा बँकेतील पाटील कुटुंबाचे प्रतिनिधित्व पुन्हा कायम राहणार आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आरीफ भाया यांनी जयश्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतील उमेदवारी अर्जांच्या माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अमळनेर सोसायटी मतदारसंघातून भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतल्याने प्रतिस्पर्धी उरला नाही आणि जयश्री पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडीमुळे आमदार अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेतील राजकीय प्रतिनिधित्व कायम राहिले आहे.
निवडीची बातमी समजताच अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांच्या वर्षावातून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आरीफ भाया यांच्यासह शहर व ग्रामीण पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक, शेतकी संघाचे संचालक, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील यांचा अमळनेर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. त्यांनी यापूर्वी बाजार समिती आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रतिनिधित्व केले आहे. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शेतकी संघ या संस्थांमध्येही त्यांच्या नेतृत्वाखालील गटाचे वर्चस्व कायम असल्याचे राजकीय चित्र आहे.
नव्या कायदेशीर तरतुदींमुळे आमदार अनिल पाटील यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात न उतरता पत्नी जयश्री पाटील यांना अमळनेर सोसायटी मतदारसंघातून संधी दिली होती. जयश्री पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य तसेच अमळनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. या अनुभवामुळे त्यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
जयश्री पाटील यांच्या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम करण्याची नवी संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. या निवडीचे अमळनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात विशेष पडसाद उमटले असून, तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांनाही नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
![]()

