बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ग्रामपंचायत व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा संयुक्त उपक्रम…
प्रतिनिधी | पिळोदे, ता. अमळनेर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२६-२७ अंतर्गत ग्रामपंचायत पिळोदे व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत त्वचारोग निदान व तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अमळनेर येथील प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आदित्य माहेश्वरी यांनी शिबिरार्थींची त्वचारोग तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. पिळोदे येथे सुरू असलेल्या नवचेतना शिबिरातील लाभार्थ्यांनीही या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालय पिळोदे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अमळनेर तसेच वैदेही मेडिकल, अमळनेर यांचे सहकार्य लाभले.
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या सहकार्याने बालाजी मंदिर, पिळोदे येथे १३ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नवचेतना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागी शिबिरार्थींनी योग, प्राणायाम व ध्यानाचा अनुभव घेतला. सुदर्शन क्रियेचे महत्त्व, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचे मार्ग आणि गावाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.
आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तथा ग्रामपंचायत अधिकारी श्री. पवनकुमार वाघ आणि वरिष्ठ प्रशिक्षक डॉ. आदित्य माहेश्वरी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. निरोगी शरीर, शांत मन, सकारात्मक विचार आणि सामूहिक सहभागातून गावाचा विकास साधता येतो, असा संदेश त्यांनी दिला.
आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि ग्रामविकास यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे. असे शिबिर गावागावात आयोजित करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला.
![]()

