‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेत ५७० किलो मांस, ५० किलो कातडी आणि हत्यारे जप्त…
प्रतिनिधी | अमळनेर : ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेअंतर्गत अमळनेर पोलिसांनी शहरातील पारधीवाडा भागातील कत्तलखान्यावर सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे छापा घातला. या कारवाईत विविध जनावरांचे ५७० किलो मांस, ५० किलो कातडी आणि हत्यारांसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पशुसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शकुर, अल्ताफखा अजीजखा पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान आणि शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (सर्व रा. फरशी रोड, अमळनेर) यांचा समावेश आहे. याशिवाय इक्बाल कुरेशी आणि बाबा कुरेशी (रा. अमळनेर) यांनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच इक्बाल आणि बाबा कुरेशी तेथून पळून गेले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’चे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मुस्लीम कब्रस्थानाजवळील कत्तलखान्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. निकम यांनी उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हवालदार अशोक साळुंखे, विनोद भोई, विनोद सोनवणे, नितीन मनोरे, विनोद संदानशिव आणि मंगल भोई यांच्या पथकाला छापा घालून कारवाई करण्यास सांगितले.
पोलिसांनी कत्तलखान्याला घेराव घालून उपस्थितांना तेथून न हलण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा करण्यात आला. जप्त केलेले मांस, हाडे, कातडी आणि शिंगे पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत मोठा खड्डा करून त्यात पुरण्यात आली आणि त्यावर विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
![]()

