प्रबुद्ध विहार परिसरात अपघातांचा धोका वाढला; वाहतूक पोलीस नेमून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील कचेरी रोड ते गलवाडे रोड या मार्गावरील मंगलमूर्ती चौक आणि प्रबुद्ध विहार परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात अपघातांचा धोकाही वाढल्याने कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मंगलमूर्ती चौक हा शहरातील वर्दळीचा मार्ग असल्याने या ठिकाणाहून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, चौकात तसेच प्रबुद्ध विहाराजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत आहे. परिणामी समोरासमोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत असून, अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. विशेषतः गर्दीच्या वेळेत या परिसरात वाहतुकीची समस्या अधिक तीव्र होत असून, दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचारी अशा सर्वांनाच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या भागात वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत असून, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. वाहतुकीचे नियमन नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर मंगलमूर्ती चौक आणि प्रबुद्ध विहार परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच वाहतूक विभागाने नियमित गस्त घालून बेशिस्त पार्किंगला आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभाग या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कार्यवाही करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
![]()

