आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ कार्यक्रम; आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक प्रश्नांवर मंथन…
प्रतिनिधी | अमळनेर : ब्रिटिश सत्तेविरुद्ध ‘उलगुलान’ अर्थात महान उठावाचे नेतृत्व करून जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ऐतिहासिक संघर्ष उभारणारे आदिवासी क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आदिवासी समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि रोजगाराच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी समाजबांधवांनी अभिवादन केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीतील अन्यायकारक आणि शोषणकारी व्यवस्थेविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून ‘उलगुलान’ या ऐतिहासिक उठावाचे नेतृत्व केले होते. आदिवासींचे पारंपरिक अधिकार, सांस्कृतिक अस्मिता, स्वाभिमान आणि जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व मानला जातो. त्यांचा संघर्ष केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित नसून अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरोधात उभे राहण्याची प्रेरणा देणारा आहे. त्यामुळेच आजही बिरसा मुंडा यांचे विचार आणि कार्य आदिवासी समाजासाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.
या अभिवादन कार्यक्रमाला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगरसेवक सलीम टोपी, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बैसाणे, पत्रकार ईश्वर महाजन, आदिवासी नेते आप्पा दाभाडे, मुकेश बिऱ्हाडे, दयाराम मोरे (बहादरवाडी), विनोद मोरे (खडके), सुदाम वाघ (कलाली), सुधाकर बागुल (कलाली), सुरेश भिल (देवळी), राजेंद्र वाघ (देवळी), रामदास ढालवाले, पप्पू लोंढे, रमेश सोनवणे (मुडी), दशरथ पवार (दरेगाव), वसंत जाधव, ज्योतीबाई पारधी, उषाबाई भिल, हिराबाई पारधी, कु. कल्याणी पारधी, रमेश लोंढे, प्रभू कसबे, भावराव फुलपगारे आणि मोतीराम हातांगडे यांच्यासह आदिवासी विकास सामाजिक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्नांवर उपस्थितांनी आपली मते मांडली. आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, आरोग्य सुविधा सक्षम व्हाव्यात, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच आदिवासींच्या पारंपरिक हक्कांचे आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण व्हावे, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजाच्या हक्क, सन्मान आणि विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
![]()

