अमळनेर–जळगाव रस्त्यावरील प्रकार; चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…
प्रतिनिधी|अमळनेर : सुरत येथून नागपूरला कपडे घेऊन जाणारा ट्रक अमळनेर–जळगाव रस्त्यावरील मांगीर बाबा टेकडीजवळ पेटवून मालाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साड्यांचे १४३ कार्टून, १ टन ५९ किलो २७० ग्रॅम धागे आणि १० लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण सुमारे ६१ लाख रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याबाबत ताडे (ता. एरंडोल) येथील चालक संजय रमेश पाटील याच्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सुरत येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आकीब शेख यांनी १५ ऑक्टोबर रोजी आयशर ट्रकमधून ५१ लाख रुपयांच्या साड्या व धागे नागपूरला रवाना केले होते. मात्र, १६ ऑक्टोबरला धुळे येथे दुरुस्तीसाठी ट्रक थांबला असल्याचे चालकाने सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मांगीर बाबा टेकडीजवळ ट्रक व त्यातील माल जळून खाक झाल्याची माहिती शेख यांना मिळाली.
त्यानंतर चालक संजय पाटील याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महिनाभर शोध घेऊनही तो मिळून न आल्याने शेख यांना संशय बळावला. त्यावरून त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
![]()

