संप यशस्वी करण्याचा महासंघाचा निर्धार; अमळनेरमधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग…
प्रतिनिधी | अमळनेर : समान काम – समान वेतन या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयीन कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपात सहभागी होऊन तो यशस्वी करण्याचा निर्धार अमळनेर येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केला आहे.
अमळनेर येथे न्यायालयीन कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज न्यायालय प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाने या मागणीला पाठिंबा जाहीर केला असून, उद्या जळगाव येथे सेवानिवृत्त कर्मचारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
उच्च न्यायालयीन कर्मचारी व राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुय्यम न्यायालयातील कर्मचारी अधिक काम करीत असतानाही दोघांच्या वेतनात मोठी तफावत आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सन २००६ पासून लागू असलेली वेतनश्रेणी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना लागू करावी, ही महासंघाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाकडे सादर केला होता. मात्र त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी १६ व १७ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलनही केले होते. तरीही शासन दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे पाऊल उचलले आहे.
न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क), महाराष्ट्र ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघ आणि न्यायालयीन गट ड कर्मचारी महासंघ या संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरीही शासन मागणी मंजूर करण्यात टाळाटाळ करीत असल्याची भावना कर्मचारी वर्गात निर्माण झाली आहे.
![]()

