FIR ०५६९/२०२६ मधून बचावासाठी मंडळाचे नाव वापरल्याचा आरोप; दोषींवर कारवाईची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : जय बजरंग मंडळाच्या गणेशोत्सवाच्या हिशोबावरून झालेल्या हाणामारी प्रकरणात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. हरीश राजेंद्र भावसार याने दाखल केलेली फिर्याद खोटी असून स्वतःवरील गुन्ह्यातून बचाव करण्यासाठी (काउंटर ब्लास्ट म्हणून) मंडळाच्या नावाचा गैरवापर केल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केला आहे. मंडळाचा हा खुलासा तपासाच्या रेकॉर्डवर घेण्याची आणि खोटा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी हरीश भावसार व त्याच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, सन २०२६ चा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडला असून मंडळाच्या कारभारात किंवा हिशोबात कोणताही गोंधळ अथवा वाद झालेला नाही. यावर्षीच्या उत्सवाचा संपूर्ण हिशोब मंडळाच्या अधिकृत खजिनदार व कार्यकारिणीकडून यापूर्वीच तपासून पूर्ण झाला आहे आणि त्याबाबत मंडळात कोणताही वाद नाही, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हरीश भावसार याचा मंडळाच्या हिशोबाशी किंवा आर्थिक व्यवहाराशी दुरान्वयानेही संबंध नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचे सौरभ भावसार व इतरांसोबत वैयक्तिक वाद असून, स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून (FIR ०५६९/२०२६) बचाव करण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक मंडळाचे आणि पवित्र गणपती उत्सवाचे नाव वापरले, असा आरोप आहे. खोटे कारण देऊन पोलिसांची व तपासाची दिशाभूल करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे सांगत, यामुळे सामाजिक व धार्मिक मंडळाची समाजात नाहक बदनामी होत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाला तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची तयारीही मंडळाने दर्शवली आहे.
तपासात हरीश भावसार याने केवळ वैयक्तिक आकसापोटी मंडळाचे नाव गोवून हा बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्यास, मंडळाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध स्वतंत्र कायदेशीर कारवाई (बदनामीचा दावा / Defamation) करण्याचा मंडळाचा अधिकार अबाधित राहील, असेही निवेदनात नमूद आहे. या वैयक्तिक वादात मंडळाचे अथवा कार्यकर्त्यांचे नाव गोवू नये आणि मंडळाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंतीही पोलिसांना करण्यात आली आहे. निवेदनावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
९ तारखेच्या रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास पानखिडकी भागात मंडळाचा हिशोब आणि फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली होती. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटांच्या फिर्यादींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सौरभ मिलिंद भावसार याच्या फिर्यादीवरून हरीश राजेंद्र भावसार, दीपेश महाजन व वैभव पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल असून तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेश बडगुजर करीत आहेत. तर हरीश भावसार याच्या फिर्यादीवरून मकरंद भावसार, सौरभ भावसार, जय भावसार व यश भावसार या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याचा तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.
![]()

