देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबईतील आयटी सेंटरमधून सायबर गुन्हेगारांनी 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरल्याची धक्कादायक माहिती आली समोर…
विशेष बातमी | मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) लाखो ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर (CBD Belapur) येथील SBI च्या ग्लोबल आयटी सेंटरच्या केंद्रीय सर्व्हरमध्ये हल्ला करून तब्बल 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरल्याची माहिती आहे. चोरी झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची नावे, संपर्क क्रमांक, घराचा पत्ता, कर्जाचे अर्ज आणि नवीन बँक खाते उघडण्याचे फॉर्म यांचा समावेश आहे.
चोरी झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, कर्जाचे अर्ज आणि बँक खात्याशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे ही डेटा चोरी ऑक्टोबर महिन्यातच झाली होती, मात्र बँकेने तब्बल एक महिन्यानंतर म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार (FIR) दाखल केली आहे.
डार्क वेबवर डेटा अपलोड होताच प्रकार उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, हा सायबर हल्ला 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान झाला होता. चोरीला गेलेला डेटा डार्क वेबवर (Dark Web) अपलोड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर बँकेच्या अंतर्गत पथकाने तपास सुरू करून पोलिसांत धाव घेतली.
SBI च्या तक्रारीनुसार, ‘सिरियसिम’ (Syriasim) नावाच्या हॅकर ग्रुपशी संबंधित अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या ग्लोबल आयटी सेंटरच्या सर्व्हरचा अनधिकृत ताबा मिळवला आणि महत्त्वाचा डेटा लंपास केला.
यामध्ये सुमारे 32 CSV फाईल्स चोरण्यात आल्या असून त्यामध्ये जवळपास 3.75 लाख रेकॉर्ड्स होते. याशिवाय JSON फाईल्स आणि 2,721 PDF फाईल्स देखील चोरीला गेल्या आहेत. या कागदपत्रांमध्ये सुमारे 4,280 ग्राहकांची अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
डार्क वेबवरून डेटा हटवला, तरीही ग्राहकांना मोठा धोका
बँकेने पोलिसांना सांगितले की, त्यांनी डार्क वेबवरून चोरी झालेला डेटा हटवला असून त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, डेटा हटवला असला तरी हॅकर्सनी त्याच्या प्रती (Copies) बनवल्या नाहीत किंवा इतर कोणाला विकल्या नाहीत, याची कोणतीही शाश्वती नाही.
यावर सायबर सुरक्षा आणि प्रायव्हसी तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. चोरी झालेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांना लक्ष्य करत ‘फिशिंग’ (Phishing) आणि इतर सायबर फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे SBI ग्राहकांनी अनोळखी कॉल, मेसेज आणि ईमेलपासून अत्यंत सावध राहावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत OTP, ATM पिन, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

