पांडे चौकात एसीबीच्या सापळ्यात १५ हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंताला रंगेहाथ पकडले…
प्रतिनिधी | जळगाव: वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर २०२६) ताब्यात घेतले. जळगावातील पांडे चौकात पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ₹१५,००० ची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
कारवाईत महावितरणच्या जळगाव शहर, महसूल व देयक उपविभागातील पुढील तिघांना ताब्यात घेण्यात आले:
- विशाल वसंत नेमाडे (वय ३७), सहाय्यक अभियंता (वर्ग-२)
- भरत कडू तायडे (वय ४५), वरिष्ठ तंत्रज्ञ (वर्ग-३)
- रविंद्र छन्नू पाटील (वय ४१), वरिष्ठ तंत्रज्ञ (वर्ग-३)
तक्रारदार जळगाव शहरातील ४० वर्षीय पुरुष रहिवासी आहेत. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजता तिन्ही आरोपी त्यांच्या घरी गेले. त्यांनी घरात लावलेल्या नवीन वीज मीटरची तपासणी केली, मीटर व घरातील विद्युत उपकरणांचे फोटो काढले आणि ते निघून गेले.
त्यानंतर आरोपी क्र. २ ने तक्रारदारांना फोन करून पांडे चौकात बोलावले. तेथे तिघांनी तक्रारदाराच्या घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीजचोरी होत असल्याचे सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी ₹४०,००० ची मागणी केली. पैसे न दिल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगितले.
या लाचेच्या मागणीविरुद्ध तक्रारदाराने त्याच दिवशी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी पंचांच्या उपस्थितीत तक्रारदाराच्या घरी करण्यात आली. त्यात आरोपी क्र. २ व ३ यांनी स्वतःसाठी आणि आरोपी क्र. १ साठी आधी ₹४०,००० ची मागणी केल्याचे, तर तडजोडीअंती ₹१५,००० ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम स्वीकारण्यास आरोपी क्र. २ ने संमती दर्शवली.
त्यानुसार पांडे चौकात पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. आरोपी क्र. २ ने ही रक्कम आरोपी क्र. १ कडे देण्यास सांगितले. आरोपी क्र. १ ने तक्रारदाराकडून ₹१५,००० ची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल होताच अटकेची कार्यवाही केली जाईल. एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रेखा अवतारे यांनी सापळा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली, तर पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने व पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांच्या सापळा पथकाने कारवाईत सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांचे या कारवाईला मार्गदर्शन लाभले.
लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

