तहसीलदारांच्या लेखी आदेशानंतर आंदोलन मागे; तीन आरोपी अद्याप फरार…
प्रतिनिधी | अमळनेर : नगाव येथील शरद रतन पाटील यांना डंपरखाली चिरडून ठार केल्याच्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी २८ ऑक्टोबरच्या वादातील वाळूचे ट्रॅक्टर पकडण्याचे लेखी आदेश तलाठी आणि पोलिसांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करावी, ही ग्रामस्थांची मुख्य मागणी होती. कथित सूत्रधार आणि त्याला सल्ला देणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई व्हावी, तसेच २८ ऑक्टोबरच्या वादातील वाळूचे ट्रॅक्टर जप्त करावे, असेही त्यांनी सांगितले.
फिर्यादीतील आरोपानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी शरद पाटील, प्रवीण गोसावी आणि काही जण जेवणासाठी जात असताना विपुल गोसावी याने चारचाकीने कट मारला. त्यानंतर वाहन थांबवून त्याने दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्याच वेळी वाळूने भरलेला डंपर तेथे आला आणि चालक भरत सुभाष पाटील याने तो शरद पाटील यांच्या अंगावर घातला, त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी डंपरचालक भरत पाटील याला अटक केली असून डंपर आणि चारचाकी वाहन जप्त केले आहे. विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी हे अद्याप फरार असल्याची माहिती आहे. डंपरचे मालकत्व आणि कथित चिथावणी याबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
महेश पाटील, विनोद पाटील, भूषण पाटील आणि किरण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मृताची पत्नी, आई, नातेवाईक तसेच गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या देऊन रस्ता रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
आमदार अनिल पाटील यांनी मोर्चास्थळी भेट देऊन शिष्टमंडळासह उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांची भेट घेतली. गुन्ह्याचा तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्डची तपासणी आणि उपलब्ध व्हिडिओ व इतर पुराव्यांचे विश्लेषण करावे, तसेच कथित मास्टरमाईंड आणि त्याच्या सल्लागारांनाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांनी महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. तहसीलदारांनी संबंधित तलाठ्याला नोटीस दिल्याचे सांगितले, मात्र २८ ऑक्टोबरच्या घटनेतील ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी कायद्याच्या चौकटीतच कारवाई शक्य असल्याचे स्पष्ट केले. डीवायएसपी कोते यांनी उपलब्ध पुराव्यांच्या विश्लेषणानंतर तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, या घटनेमागे २८ ऑक्टोबर रोजीचा वाद आहे. ज्ञानेश्वर गोसावी यांच्या घराजवळ वाळू उपसा सुरू असताना ट्रॅक्टर मागे घेताना धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यावेळी काहींनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्याकडे करण्यात आली होती. तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला होता.
या पंचनाम्यात शरद पाटील साक्षीदार असल्यानेच त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा गंभीर आरोप ग्रामस्थ करत आहेत. तक्रार प्रशासनापर्यंत पोहोचूनही, पंचनामा होऊनही आणि साक्षीदार असूनही एका नागरिकाचा जीव गेल्याने या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
निष्पक्ष चौकशी, प्रत्येक आरोपीची कायदेशीर जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींना न्यायालयात शिक्षा होईल असा प्रभावी तपास करणे, ही आता पोलिस आणि महसूल प्रशासनापुढील जबाबदारी आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष त्यांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
![]()

