फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांनी आगीतून वाचवलेली रोकड घरमालकास केली परत; नागरिकांकडून कौतुक…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागातील भंगार गोडाऊन आणि सिंधी कॉलनीतील एका घराला लागलेल्या आगीच्या दोन घटनांमध्ये अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. सिंधी कॉलनीतील घटनेत घरात अडकलेल्या वृद्धाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
दिनांक 11 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 11.57 वाजता गांधीपुरा भागातील दानिश स्क्रॅप या भंगार गोडाऊनला आग लागली. नगरसेवक श्रीराम चौधरी आणि नावेद शेख यांनी अग्निशमन दलास माहिती दिल्यानंतर दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवली. आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.
दिनांक 12 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजता सिंधी कॉलनी येथील प्रकाशलाल लखुमल डिंगराई यांच्या घराला आग लागली. नगरसेवक भरत ललवाणी यांनी अग्निशमन दलास दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी घरातील संपूर्ण आग विझवली. घरात एक वृद्ध व्यक्ती झोपलेली होती, मात्र दरवाजा उघडत नव्हता. जवानांनी प्रयत्नपूर्वक दरवाजा उघडून त्यांना सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जवानाचा प्रामाणिकपणा
आग विझवण्याचे काम सुरू असताना फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांनी घरातील रोकड रक्कम आगीतून वाचवली आणि ती घरमालकास परत केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
या दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, रफिक पठाण, सत्येन संदानशिव, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदानशिव आणि प्रसेनजीत सोनवणे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
![]()

