“जिथे जीवनाचा शेवट, तिथे नव्या जीवनाची सुरुवात” या संकल्पनेतून ग्रामस्थांचे श्रमदान; स्मशानभूमी परिसरात फुलणार हिरवाई…
प्रतिनिधी | अमळनेर :- तालुक्यातील तासखेडा येथे स्मशानभूमी परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ, बेल अशी 50 हून अधिक देशी झाडांची रोपे लावण्यात आली. जिथे जीवनाचा शेवट होतो, तिथेच नव्या जीवनाची सुरुवात व्हावी, या संकल्पनेतून गावकऱ्यांनी हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला. प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावून त्यांना पाणी देण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी स्वीकारली आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेविका जयश्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. माजी सरपंच प्रदीप पाटील, सरपंच कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. झाडांना पाणी देण्यासाठी रावसाहेब पाटील व ए. के. पाटील यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या.
या उपक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून, झाडांसाठी खड्डे खोदून सर्वांनी श्रमदान केले. “स्मशानभूमी म्हणजे फक्त दुःखाची जागा नाही, तर ती शांत, स्वच्छ आणि हिरवीगार असावी. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ लावलेले एक झाड पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन देईल,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. वृक्षारोपणानंतर पुढील काळात स्मशानभूमीला कुंपण घालण्याचा तसेच बसण्यासाठी बाके बसवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी गावातील दिलीप बहिरम, संतोष बहिरम, सुनील पाटील, अभिमन पाटील, गुलाब पाटील, नागेश सोनार, मच्छिंद्र पाटील, निंबा पाटील, नाना पाटील, भारत पाटील, अनिल शिंदे, अनिल पाटील, बारकू पाटील, प्रमोद पाटील, तसेच आमोदे येथील भिवराव पाटील, संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी आधार धनगर यांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून गावकऱ्यांचे कौतुक होत आहे.
![]()

