केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण नियुक्ती…
विशेष बातमी | प्रतिनिधी : भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जागतिक जैवइंधन आघाडी (Global Biofuel Alliance) साठी आंतरराष्ट्रीय उद्योग संपर्क विशेषज्ञ (International Industry Outreach Specialist) या पदावर डॉ. तुषार शिवाजीराव पाटील यांची निवड केली आहे. नवी दिल्ली येथील पेट्रोलियम मंत्रालयाने विविध टप्प्यांवरील प्रोफाइल निवड आणि मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर ही निवड जाहीर केली. ते नवी दिल्लीतील संरक्षण भवन येथे कार्यरत असतील. या पदावर डॉ. पाटील हे भारत सरकारच्या अंतर्गत ३५ देश आणि १२ आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी जैवइंधन आघाडीचे काम पाहतील. जागतिक स्तरावर जैवइंधनाच्या वापराला चालना देण्याच्या उपक्रमात ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
२०२३ मध्ये भारताच्या नेतृत्वाखाली भारत, ब्राझील आणि अमेरिका यांनी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे निरीक्षण भारताचे माननीय पंतप्रधान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करणार आहेत. तर भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कॅबिनेट मंत्री आघाडीचे नेतृत्व करणार आहेत.
डॉ. पाटील यांनी गेल्या १६ वर्षांपासून जैवइंधन उद्योगात काम केले आहे. या काळात त्यांनी विविध देशांमध्ये भारतीय उद्योगाचे प्रतिनिधित्व केले. या दीर्घ अनुभवाचा त्यांना निवडीसाठी फायदा झाला. डॉ. तुषार पाटील हे श्री. अण्णासाहेब शिवाजीराव पाटील यांचे धाकटे सुपुत्र असून दिवंगत डॉ. नितीन पाटील यांचे बंधू आहेत.
![]()

