टाकाऊ वस्तूंपासून साकारले आकर्षक कंदील; विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे मान्यवरांकडून कौतुक…
प्रतिनिधी | अमळनेर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक आकाश कंदील तयार केले. पारंपरिक सजावटीला पर्यावरण संवर्धनाची जोड देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील आणि सचिव संदीप घोरपडे यांनी कौतुक केले.
विद्यार्थिनींच्या कलागुणांना चालना देण्यासाठी शाळेत आकाश कंदील निर्मितीची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सहज उपलब्ध होणारे तसेच निरुपयोगी साहित्य कल्पकतेने वापरून विद्यार्थिनींनी विविध आकारांचे सुबक कंदील साकारले. सर्वांचे लक्ष वेधून घेणारे हे कंदील पर्यावरणपूरक असल्याने विशेष दाद मिळवून गेले.
विस्तार अधिकारी प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कलाकृतींची पाहणी करून त्यामागील संकल्पनेची उत्सुकतेने माहिती घेतली. स्वतःच्या कल्पनाशक्तीतून साकारलेले सुंदर कंदील पाहून प्रमोद पाटील यांनी विद्यार्थिनींना शाबासकी दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, स्वावलंबन आणि पर्यावरणाविषयी जागरूकता वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक डी. ए. धनगर यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी जे. एस. पाटील, दिलीप पाटील, मनीषा वैद्य, आर. एम. देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन, धनश्री वानखेडे, मोनाली वंजारी आणि धनश्री साळुंखे यांच्यासह विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
![]()

