संतप्त शिवप्रेमींच्या मागणीची दखल; पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची तत्परता आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला घेतले ताब्यात; संबंधित व्यक्तीने मागितली माफी…
प्रतिनिधी | अमळनेर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील व शिवराळ भाषेत टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या कृत्याबद्दल समाजाची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. त्यामुळे शहरातील तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत झाली असून सध्या शहरात शांतता आहे.
या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे संभाव्य तणाव टळला आणि शहरातील सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यास मदत झाली.
![]()

