गावाच्या विकासासाठी तरुणांचा पुढाकार; सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीच्या सुट्टीचा केला विधायक उपयोग…
प्रतिनिधी | प्रगणे डांगरी : प्रगणे डांगरी ते मारवड या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेता वाहनचालकांसह ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविले. दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या तरुणांनी गावातील युवकांच्या साथीने हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
प्रगणे डांगरी ते मारवड या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे झाले होते. विशेषतः रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दररोज ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती.
या परिस्थितीची जाणीव ठेवून तरुणांनी कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेतला. दिवाळीच्या सुट्टीचा केवळ मनोरंजनासाठी उपयोग न करता गावाच्या हितासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने युवकांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे संबंधित मार्गावरील वाहतुकीस काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
या श्रमदान उपक्रमात रणधीर पाटील, विरभूषण पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, दिनेश पाटील, हिलाल कोळी, लक्ष्मण पाटील, सचिन कोळी, सुनील वाडीले, निलेश पाटील, हंसराज पाटील, समाधान पाटील, सागर भोई, स्वप्निल कोळी, गोपाल पाटील, गजानन पाटील, दुर्गेश पाटील (राज), रोहित पाटील, राज वाघ, विशाल वाघ, जयेश कोळी, तुषार (ऋषि) पाटील, कल्पेश पाटील, हितेश पाटील, सौरव पाटील (ओम), यशोदीप पाटील (यश), आदित्य पाटील, गौरव (गोलू) कोळी, सार्थक पाटील, शिवा कोळी आणि धिरज कोळी आदी तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
तरुणांच्या या उपक्रमातून गावाच्या विकासासाठी केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही आपल्या परीने योगदान देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीत श्रमदानातून रस्त्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांच्या या कृतीतून सामाजिक एकजूट, गावाप्रती असलेली आस्था आणि विधायक कार्याचा सकारात्मक संदेश परिसरात पोहोचला आहे.
![]()

