अमळनेर-धुळे रोडवरील बिपीन बापूच्या पेट्रोल पंपामागे कोरड्या गवताला आग; सहा जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर-धुळे रोडवरील बिपीन बापू पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस झाडे व कोरड्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग पूर्णपणे विझवण्यात यश आले आणि संभाव्य धोका टळला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक आवश्यक अग्निशमन साहित्य व बंबासह घटनास्थळी दाखल झाले. या कारवाईत अग्निशमन कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, रफिक पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव व आकाश बाविस्कर यांनी सहभाग घेतला. जवानांनी अथक प्रयत्न करून झाडे व कोरड्या गवताला लागलेली आग पूर्णपणे विझवली.
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात फटाके वाजवले जात असताना ही आग लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आग पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस लागल्याने धोक्याची शक्यता अधिक होती. मात्र अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
![]()

