दिवाळीनिमित्त अग्निशमन दलाचा जनजागृती उपक्रम; मुले व प्राण्यांची सुरक्षितता जपण्याचे आवाहन…
प्रतिनिधी | अमळनेर : दिवाळीच्या निमित्ताने अमळनेर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना फटाक्यांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आले असून, अमळनेर अग्निशमन दलाने यासाठी जनजागृती उपक्रम राबवला आहे. मुलांची आणि प्राण्यांची सुरक्षितता जपून आनंदी दिवाळी साजरी करण्याच नागरिकांना सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी फक्त प्रमाणित (ISI) आणि कमी आवाजाचे फटाके वापरावेत, तसेच लहान मुलांना फटाके एकटे हाताळू देऊ नयेत, असे आवाहनात म्हटले आहे. फटाके उडवताना जवळ पाण्याची बादली किंवा वाळूची सोय ठेवावी. घर, झाडे, वाहने आणि ज्वलनशील वस्तूंपासून सुरक्षित अंतर राखावे. वापरलेल्या फटाक्यांचे अवशेष योग्य पद्धतीने गोळा करून कचरापेटीत टाकावेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिशय मोठ्या आवाजाचे फटाके टाळावेत, कारण ते प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. मोठ्या आवाजामुळे प्राण्यांना भीती, ताण आणि आरोग्याच्या समस्या होऊ शकतात, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.
फटाके उडवताना काही आपत्कालीन घटना घडल्यास, आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास नागरिकांनी तत्काळ अमळनेर अग्निशमन दलाशी संपर्क साधावा. त्यासाठी संपर्क क्रमांक 02587-222101 असा आहे. “सुरक्षित दिवाळी, सुरक्षित मुले, सुरक्षित प्राणी” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
![]()

