प्रभाग ३ व १५ मधील कामगारांना फराळ वाटप; “कामगारांचा सन्मान हाच खरा दिवाळी सण”…
प्रतिनिधी | अमळनेर :- शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या कष्टाची दखल घेत नगरपरिषदेचे नगरसेवक तथा अमळनेर अर्बन बँकेचे संचालक भरतकुमार ललवाणी यांनी दिवाळीनिमित्त त्यांना फराळाचे वाटप केले. प्रभाग क्रमांक ३ व १५ मधील मुकादम स्वप्नील बिऱ्हाडे, मुकादम नितीन बिऱ्हाडे (गोल्डी) यांच्यासह सफाई कामगारांसाठी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली.
स्वच्छता कामगार रोज पहाटे उठून ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता रस्ते, गटारी व सार्वजनिक ठिकाणांची सफाई करतात. सण असो किंवा सुट्टी, त्यांचे काम कधीही थांबत नाही. दिवाळीत तर घराघरांतील कचरा, फटाक्यांचा कचरा आणि सजावटीचे साहित्य यांमुळे त्यांची जबाबदारी अधिकच वाढते आणि प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना दुप्पट मेहनत करावी लागते. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच आपला प्रभाग आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसते, असे सांगत वर्षभर अथक परिश्रम घेणाऱ्या या कामगारांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फराळ स्वीकारताना कामगारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. आपल्या कष्टांची जाणीव ठेवून कोणीतरी दिवाळीच्या निमित्ताने आपला सन्मान केला, ही भावना त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. ललवाणी यांनी प्रत्येक कामगाराला वैयक्तिक भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-समृद्धीसाठीही सदिच्छा व्यक्त केल्या.
![]()

