सायंकाळी ७.३७ वाजता घडली घटना; नगरसेवक पंकज चौधरी यांच्या सूचनेनंतर अग्निशमन दलाची धाव, जवानांनी तत्परतेने विझवली आग…
प्रतिनिधी | अमळनेर : दिवाळीच्या सणानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे आणि रोषणाईचे वातावरण असताना अमळनेर शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक परिसरातील जुन्या साठे बिल्डिंग येथे आज सायंकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती नगरसेवक पंकज चौधरी यांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून संपूर्ण आग विझवली.
दिवाळीच्या काळात विद्युत रोषणाई, पणत्या, मेणबत्त्या तसेच फटाक्यांच्या वापरामुळे आगीच्या घटनांचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत राणी लक्ष्मीबाई चौकातील आगीच्या घटनेमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव आणि विजय भोई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांनी विद्युत रोषणाई, दिवे आणि फटाक्यांच्या वापराबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
![]()

