१८ × १५ सेंटीमीटर आकाराची गर्भाशयातील गाठ काढण्यात डॉ. जयेश शिंदे यांना यश; ३७ वर्षीय महिलेवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी…
प्रतिनिधी | अमळनेर : गर्भाशयात तब्बल २ हजार ५०० ग्रॅम (अडीच किलो) वजनाची आणि १८ × १५ सेंटीमीटर आकाराची फायब्रॉइडची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात अमळनेर येथील सुखांजनी हॉस्पिटलचे संचालक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जयेश शिंदे यांना यश आले आहे. शाहूनगर येथील सौ. चित्रा मुकेश भोई (वय ३७) यांच्यावर ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिविशाल आकाराची गाठ गर्भाशयापासून सुरक्षितपणे अलग करणे वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने या शस्त्रक्रियेकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौ. चित्रा भोई या गर्भाशयातील अतिविशाल फायब्रॉइडच्या समस्येने त्रस्त होत्या. तपासणीदरम्यान गर्भाशयात १८ × १५ सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ असल्याचे स्पष्ट झाले. तब्बल अडीच किलो वजनाची ही गाठ सुरक्षितपणे काढण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन, अचूक वैद्यकीय निर्णय आणि विशेष शस्त्रक्रिया कौशल्याची आवश्यकता होती. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉ. जयेश शिंदे यांनी आवश्यक वैद्यकीय दक्षता घेत संपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
एवढ्या मोठ्या आकाराची फायब्रॉइडची गाठ काढताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन आणि वैद्यकीय टीममधील समन्वय महत्त्वाचा ठरतो. डॉ. शिंदे यांनी आपल्या अनुभवाच्या बळावर या आव्हानाला सामोरे जात शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये संपूर्ण वैद्यकीय टीमनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. जयेश शिंदे म्हणाले की, अतिविशाल गर्भाशयातील फायब्रॉइडची ही समस्या अत्यंत गुंतागुंतीची होती. एवढी मोठी गाठ गर्भाशयापासून सुरक्षितपणे अलग करणे ही वैद्यकीयदृष्ट्या मोठी जोखीम आणि आव्हान होते. शस्त्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याने प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक नियोजन आणि अचूक निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र, भगवंताच्या कृपेने संपूर्ण वैद्यकीय टीमच्या अथक परिश्रम, एकजूट, समन्वय आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करता आले. या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णाच्या कुटुंबीयांनी दाखवलेला विश्वासही महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी सांगितले.
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानासोबतच डॉक्टरांचा अनुभव, रुग्णाप्रती असलेली संवेदनशीलता आणि वैद्यकीय पथकाचे समर्पित प्रयत्न यांचे महत्त्व या शस्त्रक्रियेतून अधोरेखित झाले आहे. सुखांजनी हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अमळनेरच्या स्थानिक आरोग्यसेवा क्षेत्रातील वैद्यकीय क्षमतेचीही चर्चा होत आहे.
![]()

