नाशिकच्या गोठ्यातील अग्नितांडवात १८ गायींचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका; पशुसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल…
प्रतिनिधी | अमळनेर: तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी तथा पंचायत समितीचे माजी सभापती आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांना पशुसेवा आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युवकभारती संस्था व खाटू श्याम बाबा देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. दीपक पाटील हे जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात पशुधनाच्या आरोग्यसेवेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी अनेक आजारी व जखमी मुक्या प्राण्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. पशुधनावर औषधोपचार करण्यासोबतच लसीकरण, गर्भपात, वंध्यत्व तपासणी, कृत्रिम रेतन, पशुगणना आदी तांत्रिक कामांमध्येही ते सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
विशेषतः २८ मे २०२६ रोजी नाशिकमधील पंचवटी परिसरातील एका गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत १८ गायी भाजल्या होत्या, तर दोन गायींचा मृत्यू झाला होता. या संकटाच्या वेळी नाशिक पशुचिकित्सालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव आहेर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. दीपक पाटील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू केल्याने उर्वरित गायींचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यांच्या या धाडसाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीसह पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन युवकभारती संस्था व खाटू श्याम बाबा देवस्थान समितीतर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक तथा सुरत महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉ. नरेंद्र पाटील होते. युवकभारती संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. दत्ता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष संभाजी लोटन पाटील, अमळनेर शेतकी संघाचे उपाध्यक्ष गणेश भामरे, माजी सभापती आशा ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील, सरपंच कोकिळाबाई ठाकरे, सुरत येथील उद्योजक प्रवीण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दीपक पाटील यांच्या या सन्मानामुळे मांडळ गावासह अमळनेर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![]()

