हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शिक्षकांनीही घेतला कलानिर्मितीचा आनंद, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ…
प्रतिनिधी | अमळनेर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी प्रताप हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीतील हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही स्वतः आकाशकंदील तयार करून उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी शाळेचा परिसर दिवाळीपूर्वीच उजळून निघाला.
शाळेचे चेअरमन सीए नीरज अग्रवाल आणि मुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रारंभी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शाळेचे कला शिक्षक डी. एन. पालवे यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील निर्मितीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून विविध आकारांचे आणि आकर्षक आकाशकंदील तयार केले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्मांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत कलानिर्मितीचा आनंद घेतला. सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव जोपासण्याचा संदेशही यातून देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शिक्षक निखिल पाटील, सचिन अहिरे, कृष्णा कोळी, सुहास खांजोडककर, जयश्री पाटील, नम्रता दोरकर तसेच लिपिक सागर पवार आणि शिपाई प्रसाद गोसावी यांनीही स्वतः आकाशकंदील तयार केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले सर्व आकाशकंदील दिवाळीनिमित्त शाळेच्या परिसरात लावण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या कलाकृतींमुळे शाळेच्या वातावरणात दिवाळीचा उत्साह निर्माण झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली. फटाके आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या बाबींचा वापर टाळून निसर्गाची काळजी घेत सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.
आकाशकंदील निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासोबतच स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोख्याची मूल्ये रुजविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरला.
![]()

