७ नोव्हेंबरपासून कार्ड नसले तरी सवलत; गावोगावी विशेष शिबिरे घेऊन १०० टक्के नोंदणीचे एसटी महामंडळाचे आदेश…
विशेष बातमी | मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला प्रवाशांना एसटी प्रवासभाड्यात मिळणाऱ्या सवलतीसाठी अनिवार्य केलेली NCMC कार्डची अट शिथिल केली आहे. ही शिथिलता ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहील. या काळात सर्व महिला लाभार्थ्यांनी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्याचे निर्देश महामंडळाने सर्व विभागांना दिले आहेत. वाहतूक खात्याच्या मध्यवर्ती कार्यालयाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी काढलेल्या पत्रातून हा निर्णय कळविला आहे.
नोंदणी कमी, म्हणून निर्णय
जेष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र महिला लाभार्थ्यांची संख्या मोठी असताना आतापर्यंत केवळ १.१० कोटी कार्डची नोंदणी किंवा वितरण झाले आहे. विशेषतः गाव-खेड्यातील महिलांना माहितीच्या अभावामुळे नोंदणी करता आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात आली आहे.
कार्ड नोंदणी व वितरण वेगाने व्हावे, यासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत १०० टक्के NCMC कार्ड नोंदणी व वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हे पत्र प्रादेशिक व्यवस्थापक (सनियंत्रण समिती क्र. १ ते ६) आणि मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड यांसह राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पाठविण्यात आले आहे.
![]()

