अकरा साक्षीदार तपासूनही सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश; घटनेची वेळ, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती न्यायालयाने ठरवल्या महत्त्वपूर्ण…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर बसस्थानकावर दरोड्याचा प्रयत्न केल्याचा तसेच मध्यस्थी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण व धमकी दिल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांची अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मृदुला कोचर यांनी निर्दोष मुक्तता केली. सुनीता सागर चौधरी (३९, रा. वाघाडी, पंचवटी, नाशिक) आणि ममता सतीश चौधरी (२५, रा. तांबेपुरा, जळगाव) यांच्याविरुद्धचे आरोप संशयापलीकडे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या प्रकरणात न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५(१) अन्वये दोन्ही आरोपींना सर्व आरोपांतून मुक्त केले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३३२, ३९३, ५०४ आणि ५०६ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांचे जामीन बंधपत्र रद्द करून जामीनदारांना मुक्त केले. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३७-अ नुसार प्रत्येकी १५ हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र व जातमुचलका सहा महिन्यांसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.
सरकारी पक्षाच्या आरोपानुसार, १७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता अमळनेर बसस्थानकावर दोन्ही महिलांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थी केली असता आरोपींनी पोलीस चौकीत तिच्याशी शिवीगाळ करून मारहाण केली आणि धमकी दिली, असा आरोप होता. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६३/२०२३ दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने एकूण अकरा साक्षीदार तपासले. मात्र, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आणि सुधारणा आढळून आल्याचे न्यायालयाने नमूद केले. मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्नाबाबत फिर्यादी महिलेची मुलगी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कथित घटना घडलेल्या बसचा पंचनामा करण्यात आला नव्हता आणि बसमधील अन्य प्रवाशांनाही साक्षीसाठी तपासण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे बस नियंत्रण तक्त्यानुसार संबंधित बस दुपारी १२.३० वाजता सुटणार नसल्याचे दिसून आल्याने घटनेच्या वेळेबाबतच संशय निर्माण झाला.
महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाबाबतही न्यायालयाने महत्त्वपूर्ण त्रुटी निदर्शनास आणल्या. कर्तव्य नोंदवहीतील नोंदीनुसार फिर्यादी आणि साक्षीदार महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी दुपारी १४ ते रात्री २० वाजेपर्यंत होती. मात्र, न्यायालयातील साक्षीमध्ये सकाळी ८ ते रात्री ८ अशी ड्युटीची वेळ सांगण्यात आली. त्यामुळे कथित घटना घडली त्या वेळी संबंधित महिला पोलीस कर्मचारी कायदेशीररीत्या कर्तव्यावर होत्या, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही.
याशिवाय वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या जखमा आणि फिर्यादीने साक्षीदरम्यान सांगितलेल्या जखमांमध्ये तफावत आढळली. वैद्यकीय प्रमाणपत्रांवर संबंधित व्यक्तीची ओळख किंवा सही नसणे आणि मेडिको-लीगल केस (एमएलसी) नोंदवही सादर न होणे, या बाबीही न्यायालयाने विचारात घेतल्या. तसेच पोलीस व्हॅनच्या प्रस्थान व आगमनाच्या वेळा आणि किलोमीटरची नोंद वाहन नोंदवहीत उपलब्ध नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
शिवीगाळ व धमकीच्या आरोपांबाबतही न्यायालयाने कायदेशीर निकष स्पष्ट केले. केवळ धमकी दिल्याचे सांगणे पुरेसे नसून फौजदारी धाकदपटशाहीचे आवश्यक घटक सिद्ध होणे गरजेचे आहे. मात्र, आरोपींनी नेमके कोणते शब्द वापरून धमकी दिली, याचा स्पष्ट उल्लेख साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळला नाही. एका साक्षीदाराचे फिर्यादीच्या पतीशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचेही समोर आल्याने त्याच्या साक्षीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न न्यायालयाने विचारात घेतला.
अखेर सरकारी पक्षाचे प्रकरण विसंगत, परस्परविरोधी आणि पुराव्यांच्या दृष्टीने अपुरे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही महिलांची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता के. आर. बागुल यांनी, तर आरोपींतर्फे अॅड. के. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
![]()

