२००९ ते २०२६ या कालावधीतील नियमित व विशेष लेखापरीक्षण शुल्काची तपासणी करण्याची संचालक रावसाहेब मांगो पाटील यांची मागणी; २०२५-२६ मध्ये तब्बल १ कोटी ६ लाख ७९ हजार रुपये अदा केल्याची नोंद…
प्रतिनिधी | अमळनेर : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या (ग. स. बँक) नियमित व विशेष लेखापरीक्षणापोटी सन २००९ ते २०२६ या कालावधीत अदा करण्यात आलेल्या शुल्कात तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शासन निर्णय व सहकार विभागाच्या परिपत्रकानुसार लेखापरीक्षण शुल्काची पडताळणी करून नियमापेक्षा जादा रक्कम अदा झाली असल्यास ती संबंधितांकडून वसूल करावी, तसेच जबाबदार तत्कालीन पदाधिकारी, लेखापरीक्षक आणि संबंधित कंपनीवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग. स. बँकेचे संचालक रावसाहेब मांगो पाटील यांनी जिल्हा लेखापरीक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
संस्थेच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नियमित व विशेष लेखापरीक्षणापोटी एकूण १ कोटी ६ लाख ७९ हजार २०५ रुपये अदा करण्यात आल्याची नोंद उपलब्ध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढी मोठी रक्कम कोणत्या आदेशानुसार, कोणत्या निर्धारित दराने आणि नेमक्या कोणत्या कामासाठी अदा करण्यात आली, याची सखोल तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
लेखापरीक्षण शुल्क अदा करताना सहकार विभागाचे लागू शासन निर्णय, परिपत्रके, निर्धारित शुल्काचे दर, संस्थेचे खेळते भांडवल आणि लेखापरीक्षणाचे स्वरूप यांचा योग्य विचार करण्यात आला होता का, हा प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संस्थेचे खेळते भांडवल सन २००९ ते २०२६ या कालावधीत सुमारे ५०० कोटींपासून १ हजार ३५० कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती असून, या आर्थिक स्थितीनुसार शासनाने निश्चित केलेल्या दरांप्रमाणेच शुल्क अदा करण्यात आले होते का, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विशेष लेखापरीक्षणासाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट कंपनीची नियुक्ती करताना सक्षम प्राधिकाऱ्याचा लेखी आदेश होता का, शुल्क निश्चित करण्यासाठी कोणता शासन निर्णय अथवा सहकार विभागाचे परिपत्रक लागू होते, तसेच विशेष लेखापरीक्षणाचे काम, कालावधी आणि व्याप्ती यांचा विचार करून शुल्क निश्चित करण्यात आले होते का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याशिवाय लेखापरीक्षण शुल्काचे अंदाजपत्रक, दरपत्रक, नियुक्ती आदेश आणि सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी यासंबंधीची कागदपत्रे उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संस्थेच्या वार्षिक अहवालातील एकत्रित नफा-तोटा पत्रकाच्या ‘एन’ नमुन्यात लेखापरीक्षण शुल्काची आर्थिक वर्षनिहाय माहिती सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, विशेष लेखापरीक्षणासाठी अदा करण्यात आलेल्या शुल्काचा तपशील, त्यामागील आदेश आणि मंजुरी यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
तक्रारीनुसार, सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत तत्कालीन अध्यक्ष उदय मधुकर पाटील आणि अजबसिंग सोनू पाटील यांच्या कार्यकाळात संबंधित आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती उपलब्ध आहे. तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापनाने संबंधित कंपनीशी संगनमताने व्यवहार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तथापि, संबंधित खर्च मंजूर करणे, बिलांची पडताळणी करणे, रक्कम अदा करण्याचे आदेश देणे आणि शासन निर्णयांचे पालन करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती, हे संस्थेचे ठराव, आर्थिक नोंदी आणि अन्य अभिलेख तपासून निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लेखापरीक्षण शुल्काबाबत सुधारित शासन दरांची माहिती संचालक मंडळाच्या बैठकीत तसेच सर्वसाधारण सभेत तत्कालीन अध्यक्षांकडून उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच सभासद आणि संचालकांनी लेखी अथवा तोंडी स्वरूपात उपस्थित केलेल्या हरकतींची मासिक व सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तात नोंद घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली गेली का, संस्थेच्या निधीचा विनियोग नियमानुसार झाला का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय संबंधित रक्कम नियमबाह्य असल्याचा अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही, अशी भूमिका तक्रारीत स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध पूर्वग्रहदूषित निष्कर्ष न काढता, शासन निर्णय, सहकार विभागाची परिपत्रके, नियुक्ती आदेश, मंजुरीचे ठराव, लेखापरीक्षण अहवाल आणि आर्थिक नोंदी यांच्या आधारे स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. नियमापेक्षा जादा शुल्क अदा झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी संचालक रावसाहेब मांगो पाटील यांनी केली आहे.
![]()

