भरती प्रक्रिया राबविणाऱ्या पोलीस दलानेच प्रशिक्षण दिल्यास उमेदवारांच्या चुका टळतील : आमदार अनिल पाटील; तरुणांच्या मेहनतीला योग्य संधी मिळण्याचा विश्वास…
प्रतिनिधी | अमळनेर : जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात अमळनेर येथील विविध अकादमींच्या सुमारे २५० तरुण उमेदवारांनी सहभाग नोंदविला. प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात आयोजित या शिबिरात पोलीस भरतीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी आणि पात्रतेच्या निकषांबाबत जिल्हा पोलीस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबांतील तरुणांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, जळगाव जिल्हा पोलीस दलाने गोरगरीब व ग्रामीण भागातील तरुणांसाठी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पोलीस दलाकडूनच भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या उमेदवारांच्या मेहनत व परिश्रमाला यश मिळण्याची संधी निर्माण होईल. जळगाव जिल्हा पोलीस दलाचा हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा आणि राज्यभर पोलीस दलामार्फतच अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी सांगितले.
आमदार अनिल पाटील यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले की, प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रिया राबविणारे पोलीस अधिकारीच उमेदवारांना प्रशिक्षण देत असल्याने भरतीच्या नियमांबाबत आणि प्रक्रियेतील बारकाव्यांबाबत अचूक माहिती मिळेल. त्यामुळे उमेदवारांकडून होणाऱ्या चुका टाळता येतील. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे आपल्याच भूमीतील असल्याने त्यांनी अमळनेरच्या तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणे ही अभिमानाची बाब आहे. उमेदवारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळ आणि स्वतःच्या माध्यमातून क्रीडा संकुलात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अनेक उमेदवार ऐन भरतीच्या वेळी तयारीला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो आणि भरतीचे नियम तसेच आवश्यक कागदपत्रांची पुरेशी माहिती नसल्याने अडचणी येतात. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना भरती प्रक्रियेची पूर्वकल्पना मिळणार असून ते कागदपत्रांसह आधीपासूनच सज्ज राहू शकतील. या उपक्रमातून सामान्य कुटुंबांतील अधिकाधिक तरुणांना पोलीस सेवेत जाण्याची संधी मिळावी, हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हा पोलीस दलातील सुनील निकम, विजय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर सैय्यद, मेघना जोशी, प्रियांका टिकारे, रज्जाक सैय्यद, संदीप पाटील, किरण सपकाळे, विजय कोळी आणि दिग्विजय दाभाडे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. कागदपत्रांची पूर्तता, शारीरिक क्षमता, लेखी परीक्षा, मैदानी चाचणी आणि भरतीसाठी आवश्यक पात्रता याबाबत व्याख्यानांसह प्रत्यक्ष मैदानावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
भरती प्रक्रियेतील संभाव्य अडचणी, महत्त्वाचे बारकावे आणि आवश्यक कागदपत्रांबाबत अचूक मार्गदर्शन मिळाल्याने सहभागी उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, धनराज कोळी, नामदेव बोरकर, कविता ठाणगे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाटील, नितीन कापडणे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, नाना धनगर तसेच खान्देश शिक्षण मंडळाने सहकार्य केले.
![]()

