बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा स्तुत्य उपक्रम; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…
प्रतिनिधी | अमळनेर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर ओढवणारे संभाव्य संकट लक्षात घेता सभापती अशोक पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच कार्यकर्त्यांनी लावलेले वाढदिवसाचे बॅनर काढून टाकावेत, अशा सूचना दिल्या होत्या. बाजार समितीतील शेतकरी, कर्मचारीवृंद, हमाल-मापाडी आणि व्यापारी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता उत्सवावर खर्च करण्याऐवजी त्याचा उपयोग समाजहितासाठी व्हावा, या भूमिकेतून त्यांनी मदतीचा निर्णय घेतला.
यानुसार उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, सचिव डॉ. उन्मेष राठोड, सहसचिव सुनील पाटील, योगेश महाजन, अशोक वाघ आणि अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, दुष्काळाचे चटके ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसू नयेत आणि त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने सभापती अशोक पाटील यांनी लोणसह ग्रामीण परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त होणारा खर्च सामाजिक कार्यासाठी वळवून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही हातभार लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
![]()

