आयात शुल्कमाफीची मुदतवाढ रद्द करण्यासाठी अमळनेर तालुका काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांकडे निवेदन सादर…
प्रतिनिधी | अमळनेर : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के आयात शुल्कमाफीची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ ऐवजी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही मुदतवाढ तातडीने रद्द करून देशांतर्गत कापूस उत्पादकांना योग्य भाव मिळण्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली असून, बाजारात कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आयात शुल्कमाफीची मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने नोव्हेंबर महिन्यापासून देशांतर्गत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, केंद्र सरकारने ही मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढविल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कापसाची कमी पेरणी आणि वस्त्रोद्योगासाठी कच्च्या मालाची संभाव्य कमतरता ही कारणे पुढे करून केंद्रीय कापड मंत्रालयाने आयात शुल्कमाफीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करून ही सवलत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे परदेशातून आयात होणारा कापूस भारतीय बाजारपेठेत तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतो. परिणामी देशांतर्गत कापसाच्या बाजारभावावर दबाव निर्माण होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणे कठीण होण्याची शक्यता काँग्रेस कमिटीने निवेदनात व्यक्त केली आहे.
निवेदनानुसार, यंदा कापसाचा किमान आधारभूत भाव प्रतिक्विंटल ७ हजार ६९० रुपये असताना उत्पादन खर्च जवळपास ८ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे हमीभाव आणि उत्पादन खर्च यामध्येच तफावत असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण व्यापाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच कापसाला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपला माल बाजारात आणण्यास विलंब करू शकतात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापसाची आवक कमी होण्याची शक्यताही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि उत्पादन खर्चाचा विचार करून ११ टक्के आयात शुल्कमाफीची मुदतवाढ तातडीने रद्द करावी. तसेच देशांतर्गत कापसाला रास्त भाव मिळण्यासाठी शेतकरीहिताचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
![]()

