सुरक्षेचे साहित्य न पुरवल्याचा ट्रॅक्टर मालकावर आरोप; घटनेनंतर पाच महिन्यांनी अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
प्रतिनिधी | अमळनेर : धान्य मळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या थ्रेशर मशीनमध्ये केस अडकल्याने महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना २६ मे २०२६ रोजी सकाळी देवळी शिवारात घडली होती. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून न दिल्याने हा अपघात घडल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी तब्बल पाच महिन्यांनंतर, ३ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर मालकाविरुद्ध निष्काळजीपणा व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील देवगाव देवळी येथील छबिलाल पुंडलिक पाटील यांच्या ट्रॅक्टरला धान्य मळणीचे थ्रेशर मशीन जोडण्यात आले होते. या मशीनद्वारे धान्य काढण्याचे काम अंजनाबाई नाना भिल या महिला मजूर करीत होत्या. २६ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास काम सुरू असताना त्यांचे केस अचानक मशीनमध्ये अडकले. त्यामुळे त्यांचे डोके मशीनच्या दिशेने ओढले जाऊन डोक्याला दुखापत झाली.
ट्रॅक्टर मालकाने काम करताना आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवले नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप अंजनाबाई भिल यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. घटनेनंतर उशिराने त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर मालक पुंडलिक छबिलाल पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (अ) व १२५ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल उदय बोरसे करीत आहेत.
![]()

