पाणीपुरवठा अभियंत्याची कॉलर पकडल्याचा आरोप; शासकीय आदेश फाडून चौघांनी घातला कामात अडथळा, संबंधितांवर गुन्हा दाखल…
प्रतिनिधी | अमळनेर : राजाराम नगर परिसरात अनधिकृत नळजोडण्यांचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा पथकाला दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाच्या कामाचा अधिकृत आदेश फाडून टाकल्याचा, तसेच पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची कॉलर पकडल्याचाही आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.
राजाराम नगर परिसरातील काही नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या, तर काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबर रोजी दुपारी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांच्यासह विजय विसावे, राजेंद्र हडपे, गणेश पाटील, कमरोद्दीन शेख आणि कंत्राटी कर्मचारी परेश उदेवाल हे परिसरात पाण्याच्या गढूळपणाचे कारण शोधण्यासाठी गेले होते. यावेळी जलवाहिनीतील गळती आणि अनधिकृत नळजोडण्यांची तपासणी सुरू असताना दाऊत पिंजारी व भानुदास त्र्यंबक पाटील यांच्या घराशेजारी मोठ्या जलवाहिनीवर अनधिकृत नळजोडण्या आढळल्याचा दावा पथकाने केला.
या नळजोडण्यांचा पंचनामा सुरू असताना गौरव पाटील, हर्ष पाटील आणि निलेश (पूर्ण नाव माहीत नाही) हे तेथे आले. त्यांनी पथकाला तुम्ही येथे काय करीत आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर दाऊत पिंजारी हे वकिली पोशाखात घटनास्थळी आले. त्यांनी आपण उच्च न्यायालयात वकील असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना नोकरी घालविण्याची तसेच मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी अभियंता सत्यम पाटील यांनी संबंधितांकडे दोन नळजोडण्यांच्या अधिकृत पावत्या असल्यास दाखविण्याची मागणी केली. मात्र, पावत्या किंवा कोणताही अधिकृत आदेश सादर न करता पिंजारी यांनी अनधिकृत नळजोडणी शोध मोहिमेसाठी दिलेला शासकीय आदेश फाडून टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर गौरव, हर्ष आणि निलेश यांनी आधी दूषित पाण्याचा बंदोबस्त करा, असे म्हणत पथकाच्या कामात अडथळा आणला. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. गौरव पाटील यांनी अभियंता सत्यम पाटील यांची कॉलर पकडून उपस्थित लोकांना भडकविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
पथकाने संबंधितांना गटारीच्या शेजारी अनधिकृत नळजोडण्या असल्यामुळे पाणी गढूळ होत असल्याची शक्यता सांगितली. तसेच यासंदर्भात ठेकेदाराला सूचना दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, संबंधितांनी दबाव टाकून पथकाला घटनास्थळावरून हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पथकाने दाऊत पिंजारी, भानुदास त्र्यंबक पाटील आणि रवींद्र फकिरा थोरात यांच्याकडे अनधिकृत नळजोडण्या असल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला.
या अहवालानंतर वरिष्ठांच्या आदेशाने चौघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न आणि दूषित पाणीपुरवठ्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
![]()

