लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत जळगावातील आदर्शनगरमधील घरातून १.४१ कोटींची रोकड, तर बँक लॉकरमधून सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने सह एकूण ५ कोटी १६ लाखांची मालमत्ता आढळली…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथील मूळ रहिवासी आणि लाच घेताना रंगेहात पकडलेले जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता सतीश मन्सूलाल शिसोदे यांच्या घराची व बँक लॉकरची झडती घेतली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये घरातून १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांची रोकड, तर बँक लॉकरमधून ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे आणि प्लॅटिनमचे दागिने मिळून आले आहेत. या प्रकरणी शिसोदे यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव शहरातील आदर्शनगर परिसरात असलेल्या शिसोदे यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या तपासादरम्यान घरात मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. एकाच ठिकाणी १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांची रोकड मिळाल्याने तपास यंत्रणांनाही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळल्याचे समोर आले आहे.
तसेच, बँकेच्या लॉकरची तपासणी केली असता ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये किमतीचे विविध मौल्यवान दागिने व वस्तू आढळल्या. यामध्ये सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, पाटल्या, चेन, बांगड्या, चांदीच्या लगडी, ताटे, वाट्या तसेच प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे.
घरातील रोकड आणि बँक लॉकरमधील मौल्यवान वस्तूंची एकत्रित किंमत ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये असल्याचे समोर आले आहे. लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या शासकीय अभियंत्याच्या झडतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिसोदे यांना न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
![]()

